Monday, 23 July 2018

तिचे जगणे......

ती गंधाळते कायम
स्पर्शाचा गधं नसलेल्या
कोऱ्या करकरीत शब्दांसाठी...
सोडते रिकामी जागा
प्रत्येक ओळींमध्ये अदृश्य
उदगारचिन्हाच्या हुंकारासाठी...
खात्री नसतेच तिला प्रकाशाची
म्हणूनच कागदावर रेखाटते
काळजातले जिवंत काजवे
आयुष्यातल्या अंधारावर
लुटूपुटीची मात करण्यासाठी...
डोळ्यातला थेंब थेंब पेरते
स्वप्नांतल्या पळसफुलांना
कल्पनेत रुजवण्यासाठी...
तप्त धरणीने आकांताने
ओल शोधावी तशी
खोलवर भेगाळत जाते
बाभळफुलांची कविता
माथ्यावर सजवत मिरवत
अविरत.. आजन्म..जगण्यासाठी...
राणी मोरे
रोहा रायगड



Monday, 8 May 2017

रात्रीच्या काळोख,
अलगद अंगावर पांघरताना..
मी असते ऑनलाइन,
तुझ्या आठवणीत गुरफटलेली..
अस्ताव्यस्त पसरलेले असते,
तुझ्या स्मृतीचे इंटरनेट मझ्याभोवती.......
मग स्वप्नांचे पक्षी,
अलगद उतरतात मनाच्या किबोर्डवार......
मी निग्लेक्ट करायचा प्रयत्न करते त्यानां पण प्रचंड दुखरी वेदना देऊन ते जाऊन बसतात, रिसाइकलबिन मध्ये,
पुन्हा नव्याने ओपन होण्यासाठी...
तुझ्या मनाचे बेगुमान अश्व उधळतच नाहीत का?
कि तू सृजनाचा कन्सेप्ट मिटून घेतोस डायरीत कोणत्याही तक्रारीशिवाय....
तुझ्या ह्या अलिप्तपणामुळे आपल्या रिलेशनला अर्थ देणारे सारे रेफ्रेंसेस विरघळत जातात माझ्या डोळ्यातून कोसळणाऱ्या मान्सूनमध्ये तेव्हा आयुष्याची सारी समीकरणं बदलून जातात...आणि व्यापून उरतात फ़क़्त लोनलीनेसची  गणितं...
एवढी उलथापालथ होऊनही मनाच्या वालपेपर वर फ़क़्त तूच मिस्किल हसत असतोस जणु काही घडलचं नाही अश्या अविर्भावात......
                     ranimore947@gmail. com

Friday, 5 May 2017

अवकाळी। (काव्यांजलि)

*स्त्रीचे जगणे*
*आयुष्य जातं पिसुन*
*व्यथा सोसून*
*उंबरठयात*

*स्त्रीचे आयुष्य*
*ओल्या भावनांचा तोरा*
*कागद कोरा*
*व्यवहाराचा*

*स्त्रीचे आयुष्य*
*किती स्वप्नांना गाडले*
*ध्येय सोडले*
*संसारसाठी*

*स्त्रीचे जगणे*
*श्रेष्ठत्वाची देखणी आरास*
*पूजनियतेचा भास*
*नारीत्वाचा*

*स्त्रीचे जगणे*
*फूलणे चैत्र पालवात*
*गंधमोगराची जात*
*अबोलपणात*

*स्त्रीचे जगणे*
*गहिवर असा काळजाला*
*करकरीत सांजेला*
*पापण्यांत*

*स्त्रीचे जगणे*
 *श्वासात डोलणं गुत्याड्याचं*
*नियतीच्या गारुड्याचं*
*अवकाळी*


   
     ranimore947@gmail. com

Thursday, 4 May 2017

(प्रेमपत्र)


प्रिय....,

किती.... अपुरं....किती...अधूरं...
कोणती साद घालू? तुझी साद किती ओळखीचि तरीही किती अनोळखी!.. असण्याच्या जरा पलीकडे आणि नसण्याच्या जरा अलीकडे तूझे अस्तित्व माझ्यासाठी. तू माझे वास्तव नाहीस पण स्वप्नसुद्धा निश्चितच नाहीस.

माझ्यातुन न थकता निरंतर  बोलणारा तु तुझ्याशी बोलताना अवघडून गेलेली मी. खूप जवळचं इतकं जवळ यावं की काही दिसूच नये तसंच खूप बोलायचं आहे पण काही सुचुच नये असं काहिसं होतं.कुठल्या अनामिक क्षणी भेटलो आपण?तुला माझ्याशीच बोलावसं का वाटलं असेल....? त्या क्षणापासून जगण्याचे सारे परिमाणच बदलून गेले.तुझी घट्ट  मोहिनी आयुष्य व्यापून उरली.एकटी बसून मैफलित बसल्याचा आनंद दिलास सगळ्यात असताना एकटेपणाचा आभास दिलास.

प्रत्येकवेळी वेगवेगळे प्रश्न मांडत गेलास माझ्यासमोर.
माझ्या सुखाची उदगारचीन्हें!!!!!दुःखाची विरामचिन्हें,,,,ठरवत गेलास स्व:ताच्याही नकळत. अडीच अक्षरांचा अविष्कार त्याचा अनुभव इतका विलक्षण असतो हे तुझ्यामुळेच उमगलं. आयुष्याच्या वाळवंटात व्यवहारी उंटावरच्या शहाण्यांच्या सोबत केलेला प्रवास आणि तुझ्याबरोबरचा कल्पकुसुमांच्या राज्यात केलेला स्वप्नमय प्रवास.हे देणं किती नक्षत्रमोलाचं आहे.

तुझ्या भेटीअगोदरचा पाऊस सुंदर होताच पण पहिल्या सरीची हुरहुर,अंतरात रुजणारा गारवा,मृदगंधाची ओढ़ या सगळ्याला अर्थ लाभला. वास्तवाच्या उन्हात चांदन्याचे कवडसे जाणवले.

"दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे"असं गुनगुनत हे मन किती वेळा तुझ्या सवांदसुखाची वाट पहात संध्याविभोर क्षितिजावर ओठंगुन उभं रहातं.त्याला तुझ्याशिवाय कोणताच पर्याय मान्य नसतो.

आयुष्याच्या विचार करताना एकदा जरी वाटलं तुझ्या सोबतीचा हाथ सूटतोय तरी कुणासाठी---कुठे---कशाला---कुठवर---का? असे उत्तरविना पोरके प्रश्न आर्त करतात. एक अवकाश!एक रीती पोकळी!एक भयाण शांतता!संपलंच सारं! जगण्याचे सर्व प्रयत्न शांतावतात. उदास गर्दीतलं चेहरा नसलेलं केविलवाणं धड़,श्वासांना देहाच्या धर्मशाळेत थांबावसं वाटतयं तोपर्यन्त थांबू देणारं जीवंत कलेवर.

मग हे जग वाऱ्यापावसाचं, पानाफुलांच,गाण्याचं नाही रहात ते होतं निखाऱ्याचं,उपेक्षांच,जखमांच तुझ्यासाठी काहीही करण्याच्या आदिम इच्छेचं. ह्या भोवऱ्यात मी गरगरत असतानाच.......

मातीवरचा बर्फ वितळुन एखादा सुंदर अंकुर रुजुन बाहेर यावा तसा तू सस्मित व्यक्त होतोस असा व्यक्त होतोस सारे क्लेश सर्व यातना विसरून जाव्या.
एखाद्या मंदिरातल्या पवित्र घ्ंटानादाप्रमाणे आश्वासक. तू आहेस माझ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यन्त ह्या जाणीवेनं पुन्हा निरर्थकातुन अर्थपूर्ण क्षणांचे निर्झर वाहु लागतात. जे जगणं
तुझ्यावाचुन शून्यवत वाटतं त्या महाशून्यातून उमेदीची नवी रांगोळी उमटते.
आंनद,समाधान,सुख यांच्या
 रंगात रंगून जाते.

जिवन म्हणजे अनपेक्षित घटनांच मायाजाल, एखाद्या क्षणी वादळवारा तर दुसऱ्याच क्षणी सुखावणारी झुळुक,सुरळीतपणा हे स्वप्नं असतं अचानक येणारे खंजीर अनुभव हेच जगन्याच सत्य. अणि ह्या सगळ्यामध्ये कोणीतरी आपलं आहे ही भावना बारा हत्तीच बळ देते जीवनाची लढाई लढ़ण्यासाठी.....

आणि माझं बळ तू आहेस....
एक महावॄक्ष तापलेल्या मनाला सावली देणारा, भळभळणाऱ्या जखमेवर फुंकर घालणारा,आयुष्यात मिळणारे चटके सोसण्यासाठी थंडगार गारव्यासोबत जिद्द देणारा....

खरं तर तुझ्यावर लिहायला घेतलं
काळवेळेचं भान उरत नाही
कागद भरतो...... शाई संपते...
पण शब्द संपत नाहीत
शेवटी एवढ़चं म्हणेंन

"तुझ्यावर लिहिताना माझे,
शब्दही होती वेडेपिसे...
आयुच्याचे महाकाव्य,
चार ओळीत मांडू कसे....
           
                  फ़क़्त तुझीच
                      +++
                   

ranimore947@gmail.com

*केव्हा तरी सांजवेळी*,

अश्याच एका कातरवेळी..
तो म्हणाला,माझं आयुष्य.. 
सध्या खुपच झालयं वादग्रस्त...
मी म्हणाले, हरकत नाही.
फक्त माझ्या हातात हात दे,
आपल्यातलं अबोल आपलेपण
 जाणून घे....
तो म्हणाला,माझा स्वभाव 
हल्ली चीड़खोर होतोय....
मी म्हणाले , हरकत नाही.
 माझ्या आर्त डोळ्यांत बघ,
त्यातली ओल शोषुुन घे...
तो म्हणाला  अग ग्रहण 
लागलयं ग चंद्राला...
मी म्हणाले , हरकत नाही.
एकदा माझ्या मिठीत ये..
त्यातलं चांदण पिउन घे..
पण तरीही त्याने...
फाटकन तोडलं नातं..
सुरू होण्याआधीच.
मी म्हणाले मनाशीच, हरकत नाही..
........................................
...त्याला वाटलं असेल मी, 
त्याला बदलायलाच निघाले होते....
त्याला काय माहीत मी, 
स्वत:लाच त्याच्यात पहात होते..
माझा हळवेपण मला,
त्यांच्यात दिसत होते...
माझ्या खरेपणाची सावली, 
त्याच्या वागण्यात निरखत होते.....
 हरकत नाही.. खरंच 
काही हरकत नाही....
माझा आरसा हरवला,
तरी हरकत नाही....
तशिही मी कुठे, 
अजून मला गवसले होते ?
...नकोच आता शोध,
स्वतःला शोधण्याचा...

तसाहि फुटलेला कवडसा,
कुठे असतो का कुठल्या कामाचा...
म्हणून मी आता स्वतालाच म्हणते 
काही हरकत नाही..... 
काही हरकत नाही........
खरच काही हरकत नाही....

        ranimore947@gmail. com